ओंकार ट्रस्ट विषयी थोडेसे....

ओंकार ट्रस्टची स्थापना २६ जुलै १९९१, गुरुपौर्णिमा या शुभदिनी करण्यात आली व संस्था सार्वजनिक ट्रस्ट म्हणून नोंदविण्यात आली. श्री समर्थ रामदास स्वामी, विवेकानंद आदी थोर संत व सत्पुरुषांच्या तत्वज्ञानानुसार 'शिव भावे जीव सेवा' या धरतीवर ट्रस्ट कार्य करीत आहे.

ट्रस्टने गुजर-निंबाळकरवाडी येथे १ एकर जागा घेतली असून तेथे मुलांचे संस्कार वर्ग, विविध शिबिरे इ. साठी ५०० स्क़्वे.फूटचा हॉल बांधला आहे. निराधार व आर्थिकदृष्टया दुर्बल मुलांचे संगोपन ट्रस्टतर्फे केले जाते. अशा मुलांसाठी तसेच त्यांची देखभाल करणाऱ्या विश्वस्त श्रीमती मालती निमोणकर व सेवकवर्ग यांच्या निवासासाठी १६०० स्क़्वे.फूटाची इमारत बांधण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर उपक्रमांसाठी १००० स्क़्वे.फूटाची इमारत बांधण्यात आली आहे. सध्या ट्रस्ट ७ निराधार मुला-मुलींचे संगोपन व शिक्षण करीत आहे. तसेच संगोपन करीत असलेल्या १ विद्यार्थिनीस १०वी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, हिंगणे येथे ठेवण्यात आले असून तिच्याही शिक्षणाचा खर्च ट्रस्ट करीत आहे.

ट्रस्टतर्फे गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी व कर्वे स्त्री शिक्षण संस्था, हिंगणे येथे मुला-मुलींसाठी संस्कारवर्ग घेण्यात येतात, तसेच त्यांचे सर्वांगीण विकासासाठी निबंध, पाठांतर, चित्रकला व मैदानी खेळांच्या स्पर्धा हि आयोजित करण्यात येतात. याशिवाय संस्था गरजू विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती, आणि पुणे शालांत परीक्षेत संस्कृत व मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीला पारितोषक देते. ट्रस्टने मराठी व इंग्रजी हस्ताक्षर सुधारणा प्रकल्प ३५ शाळांमधून राबविला व त्याचा लाभ १०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना झाला.

ट्रस्ट गेली २० वर्षे, दर वर्षी "कल्याणी" नावाने संत व त्यांचे वांग्मय यावर अंक प्रकाशित करीत आहे. श्री समर्थ रामदास स्वामी, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री स्वामी विवेकानंद, श्री आद्य शंकराचार्य, भगवान श्री रामकृष्ण परमहंस इ. विविध संतांवर आजपर्यंत "कल्याणी" अंक प्रकाशित झाले आहेत. पावसच्या श्री स्वामी स्वरूपानंद विशेषांकास मुंबईच्या पत्रकार संघातर्फे ' पांडुरंग भटकर ' स्मृती पुरस्कार मिळाला आहे.

उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस ट्रस्टतर्फे १९९७ पासून दरवर्षी वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार देण्यात येतो.मानपत्र, स्मृती-चिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टतर्फे वेळोवेळी मान्यवर व अधिकारी व्यक्तींची व्याख्याने प्रवचने इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

न्यासाने प्रकाशित केलेल्या सर्व "कल्याणी" विशेषांकास साधक, वाचक यांचेकडून फरच उत्तम प्रतिसाद मिळत असतो. तसेच व्याख्याने - प्रवचने यांनाही उत्तम प्रतिसाद मिळत असतो.

सुसंस्कृत समाज बनविण्यासाठी बालांचे मन संस्कारित होणे आवश्यक आहे. ट्रस्टच्या या कार्यास तसेच इतर उपक्रमास समाजातील विविध स्तरांतून सक्रीय पाठींबा व सहभाग मिळत असतो.

ट्रस्टच्या वसतिगृहातील मुलांच्या आवश्यक गरजा व विकासाच्या दृष्टीने खालील कामांची पूर्तता करणे जरुरीचे आहे.

१. ट्रस्टची जागा टेकडीवर असल्यामुळे मोकळ्या जागेचे सपाटीकरण करून मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करणे व तेथे विविध खेळांच्या साहित्याचे नियोजन करणे.
२. उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई होत असल्याने अजून एक बोअरवेल करणे.

तरी आपणास विनंती की सढळ हस्ते संस्थेस मदत करून आपणही या समाजकार्यात सहभागी होऊन आम्हास उपकृत करावे. देणगीदारांना ८० ग अन्वये प्राप्तिकरात सुट मिळते.

नवीन उपक्रमानुसार रु. २०००/- व त्यापेक्षा जास्त देणगी देणाऱ्यांना कल्याणी वार्षिक अंक घरपोच पाठविला जाईल.

देणगी व्यतिरिक्त धान्य अथवा शालेय साहित्य देऊनही आपण संस्थेच्या कार्यात सहभागी होऊ शकता. तसेच संस्थेतर्फे विविध ठिकाणी चालणाऱ्या संस्कार वर्गात मार्गदर्शक म्हणून सहभागी होऊ शकता. याशिवाय मुलांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात किंवा व्यक्तिगत विकासाकरिता मार्गदर्शन करू शकता.